top of page

अर्थसाक्षरतेचे महत्त्व

Updated: Oct 4, 2022


अर्थ साक्षरता म्हणजे नक्की काय ?

हा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडला असेलच.


आर्थिक साक्षरेतीची गरज काय आहे हे थोडक्यात पाहूया :


उदाहरण १ :

विजय हा तिसऱ्या वर्षात शिकणारा अभियांत्रिकीचा विद्यार्थी. एका महिन्यात दोन मोबाइल फोन बदलतो. वडिलांनी दिलेला पॉकेटमनी दोन दिवसात संपतो. कसा?


उदाहरण २ :

अजय हा व्यवस्थापक या पदावर काम करणारा, पाच आकडी पगार असणारा कष्टाळू नोकरदार आहे. जर महिन्याच्या पहिल्या तारखेला आलेला पगार , घर , गाडी आणि क्रेडिट कार्ड चे हप्ते भरण्यात दोन दिवसात संपून जातो. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर पेट्रोलचे पैसे सुद्धा मागण्याची वेळ येते. का?


उदाहरण ३ :

सुजया . चौकोनी कुटुंब सांभाळणारी , उच्चशिक्षित गृहिणी. मैत्रिणीच्या सल्ल्यावरून , कोणत्यातरी दामदुप्पट योजनेमध्ये सहभागी झाली. विश्वासाच्या भरवशावर अनेक कागपत्रांवर साह्य केल्या. आता पश्चाताप आणि पोलीस स्टेशनच्या चकरा ....ही खूप प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.


अगदी आपल्या आजूबाजूची ...


आणि अर्थ साक्षरतेचे महत्त्व सांगण्यासाठी , समजण्यासाठी पुरेशी देखील आहेत .

हो ना ?


दररोज या अशा समस्या, लहान - मोठ्या प्रमाणात आपणही अनुभवत असतो. काही समस्या दारात दत्त म्हणून उभ्या राहतात . तर काही दारात उभे राहून दार ठोठावत राहतात. , एवढाच काय तो फरक ! !


दार कोणासाठी उघडायचे आणि कोणाला दारातूनच परतून लावायचे , याचे उत्तर फक्त तुमची विवेकबुद्धी आणि तुमचे पक्के असे आर्थिक नियोजन देऊ शकते.


जर दुर्लक्ष केले तर,आज छोट्या प्रमाणात असणाऱ्या या समस्या उद्या भयंकर रूप धारण करू शकतात. सतत भेडसावणाऱ्या आणि वाढत जाणाऱ्या या आर्थिक समस्यांतून योग्य मार्ग काढायचा असेल तर आर्थिक साक्षरतेला पर्याय नाही.


भ्रष्टाचार, घरगुती हिंसाचार , आर्थिक गैरव्यवहार अशा सामाजिक प्रश्नांचे निराकरण होण्यासाठी आर्थिक साक्षरता गरजेची आहे. आर्थिक साक्षर समाजच आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करू शकतो.


आर्थिक दृष्टया साक्षर असलेला समाज हा जास्त जागृत असेल. केवळ हक्कांबद्दल नाही, तर कर्तव्याबद्दल . त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या विचारसरणीवर दिसून येईल. ज्या अनावश्यक प्रथा , पद्धती सुधारण्याची आणि बदलण्याची नितांत आवश्यकता आहे, अशा उन्नतीकडे नेणाऱ्या नवीन पद्ध्ती आत्मसात करण्यास खरा वाव मिळेल.


भारत आत्मनिर्भर होण्यासाठी सर्व भारतीय नागरिकांनी अर्थसाक्षर होणे गरजेचे आहे.

bottom of page