top of page

एकदा तरी 'अर्थ' वारी अनुभवावी

Writer's picture: Ms. Harshadaa PotadarMs. Harshadaa Potadar

भक्तीचा महासोहळा म्हणजे आषाढी एकादशी.

आणि आषाढी एकादशी म्हणजे पंढरीचा पांडुरंग.


वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान असणाऱ्या , या १८ दिवसांच्या पायी वारीचे अध्यात्मिक, सामाजिक जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.


याबरोबरच, अनेक आर्थिक गणिते या ' वारी' शी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या जोडली गेलेली आहेत. पंढरपूरचे तर अर्थकारण , पूर्णतः आषाढी आणि कार्तिकी वारीबरोबर जोडलेले आहे. आजच्या या आषाढी एकादशीच्या दिवशी, एका वेगळया दृष्टिकोनातून वारी चा अनुभव घेऊया.

एक तरी वारी अनुभवावी.

यशस्वी उद्योजक तो असतो जो व्यवसायाच्या संधी शोधत असतो. आणि असलेल्या संधीचं सोनं करण्याची धमक त्याच्यात असते. अशाच वारी म्हणजे अशाच अनेक व्यायसायिक संधीचं कोठार. वारी आणि उलाढाल हा एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो . आपण थोडक्यात आढावा घेऊया :


वारीमध्ये सगळ्यात जास्त उलाढाल होते ती म्हणजे पाण्याची. पिण्यासाठी आणि इतर गरजांसाठीही . केवळ दोन जोड कपडे घेऊन घेऊन निघालेल्या वारकऱ्याला , जेव्हा गरज लागेल तेव्हा पाणी पुरवणारे अनेक जण येथे सापडतील. एका दिवसात मिनरल वॉटर च्या बाटल्या देऊन , एक हजारापर्यंत नफा मिळवतात.


दिंड्यासाठी लागणारी बरीचशी खरेदी ही पुण्यातूनच होते. त्यासाठी पुण्यातील व्यापाऱ्यांची महिनाभर आधीपासून तयारी चालू असते. किराणा सामान (गहू, तांदूळ, राव, साबुदाणा, शेंगदाणे, तेल, साखर, चहा पावडर, इ. ) तसेच इंधन याचा अंदाजे खर्च काही कोटी पर्यंत जातो.


त्याचबरोबर, पावसापासून बचावासाठी असलेले रेनकोट , छत्र्या यांचीही खूप मोठ्या प्रमाणात उलाढाल या काही दिवसांमध्ये होते.


आषाढी वारीसाठी १० लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या दोन्ही पालखी मार्गावर असणाऱ्या अनेक गावांच्या अर्थकारणाला , वारीमुळे एक आश्वासक वळण मिळते.


वारीच्या काळात वारकरी गरजा भागविण्यासाठी जो खर्च करतो, तो म्हणजेच पंढरीतील लोकांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन. शेती हा प्रमुख व्यवसाय असलेले किंवा शेतमजुरीवर उदरनिर्वाह करणारे वारकरी आपापल्या क्षमतेनुसार येथे खर्च करतात.


वारीसाठी येणारा प्रत्येक वारकरी प्रवासासाठी १०० रुपये, राहण्यासाठी ११० रुपये, अन्नासाठी २०० रुपये, खरेदीसाठी ९० रुपये, असा साधारण ५०० ते ६०० रुपये खर्च वारीकाळात करतो. वारीसाठी होणाऱ्या खर्चापैकी ४० टक्के रक्कम प्रवासासाठी खर्च होते. हा पैसा एसटी, रेल्वे, खासगी वाहने यांच्याकडे जातो.


राहिलेला ६० टक्के खर्च पंढरपूरमध्ये विविध सेवा, वारकऱ्यांच्या गरजा, धार्मिक वस्तूंच्या खरेदीसाठी होत असतो. म्हणूनच प्रत्येक वारकऱ्याकडून पंढरपूरमध्ये होणारा सरासरी पाच-सहाशे रुपये खर्च पंढरपूरच्या अर्थकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो.


तसेच, धामिर्क वस्तू उदा. चुरमुरे, अष्टगंध, टाळ, मृदंग, गोपीचंदन, कुंकू, बुक्का, ऑडिओ, व्हीडिओ कॅसेट, धार्मिक पुस्तके, पेढे , रेवड्या , बांगड्या यांसारख्या अनेक गोष्टींवर खर्च केला जातो, तो जवळजवळ एकूण खर्चाच्या ३० टक्के असतो.


या मागणी असणाऱ्या सगळ्याच गोष्टी पंढरपुरात तयार होत नाहीत. या वस्तूंच्या उत्पादन आणि विक्रीसाठी विशेष संधी आणि वाव आहे.


एकूण खर्चातील ३० टक्क्यांपर्यंत रक्कम खर्च केली जाते. या वस्तूंच्या विक्रीतून हजारो लोकांना रोजगार मिळतो.

हजारो लोकांना तात्पुरता आणि कायमस्वरूपी रोजगार निर्माण करण्याची आणि आर्थिक सक्षमता देण्याची , प्रचंड ताकत या विठुरायाच्या पंढरीत आहे आणि असेल. गरज आहे ती फक्त व्यापक दृष्टिकोन ठेवण्याची....

कोरोनाला दूर सारून नवा विचार करण्याची ....


केवळ पंढरपूरचे नाही तर अवघ्या महाराष्ट्राचे अर्थकारण बदलणाऱ्या या 'अर्थ' वारीला , एकदा उघड्या डोळ्यांनी अनुभवण्याची. ....


जय हरी विठ्ठल

Comments


©2024 by AimSolute.

  • Facebook
  • LinkedIn
  • YouTube
bottom of page