top of page

गुरुविण कोण दाखविल "वाट"

"गुरु" म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय "व्यक्ती"; ज्ञानाचा अखंड सागर आणि प्रेरणेचा निरंतर स्रोत .

उद्योगजगतामध्ये पाऊल ठेवताना, प्रत्येक उद्योजकाला , वित्त, उत्पादन, गुणवत्ता , तांत्रिक माहिती अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये मार्गदर्शकाची गरज पदोपदी भासते.

गुरुविण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट

अशी अवस्था तर रोजच होते. उदयोन्मुख उद्योजकाला प्रोत्साहित करणारे मार्गदर्शक तसे कमीच... रोज येणाऱ्या अडथळ्यांची शर्यत जिंकण्यासाठी मार्ग दाखविणारा ' गुरु' असावा लागतो. असेच, " दिशा " दर्शक ठरणारे हे "उद्योजकां"चे गुरु :


वर्तमानपत्र :

वर्तमानपत्राचे स्वरूप कदाचित बदलेल, माध्यम पण बदलेल , पण महत्त्व आहे तेवढेच राहील. कारण, वर्तमानपत्र हे असे माध्यम आहे ज्यातून आपल्याला जगभरातील सर्व घडामोडी आणि बातम्यां ची माहिती मिळते. वर्तमानपत्राद्वारे आपल्याला जगभरातील सर्व महत्वाच्या घटना व त्यामागील कारणे व त्यांचे परिणाम कळून येतात.

रोजचे वृत्तपत्र जगात काय चालले आहे याचे ज्ञान तर देतेच. पण विचारात सुस्पष्टता आणण्यासाठीही मदत करते. उद्योजकांना अद्ययावत राहण्यासाठी व्यायसायिक क्षेत्राला वाहीलेले अनेक वृत्तपत्रे उपलब्ध आहेत.


स्पर्धक :

उद्योग , व्यवसाय म्हटले की स्पर्धा ही आलीच. आणि त्यासोबतच स्पर्धक देखील आले. तुमचे सगळ्यात स्पर्धक हे तुमचे सगळ्यत मोठे गुरु असतात. तुमचा वेळ आणि परिश्रम वाचवण्याचे काम ते विनासायास करतात. आणि सगळ्यात महहतवाचे म्हणजे काय नाही करायचे हे कृतीमधून पटवून देतात.


ग्राहक :

तुमची सेवा अथवा बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेली वस्तू , याचे भविष्यकार जर कोणी असतील, तर ते तुमचे ग्राहक.

ग्राहक हेच गुरु

कोणत्या प्रकारे तुमच्या उत्पादनात बदल करण्याची गरज आहे ? आहे का ? किंमत रास्त आहे का ? तुम्ही अजून काय देणे गरजेचे आहे ? तुम्ही तुमच्या स्पर्धकांपासून स्वत: ला अद्ययावत करू शकता का? या सारख्या आणि अशा अनेक प्रश्नही उत्तरे म्हणजे ग्राहकांबरोबर होणारा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संवाद.

आणि हा फक्त संवाद नाही बरं का? तर तुमच्या पुढील व्यवस्थापनाची दिशा , तुमचे येणारे नवीन उत्पादन , तुमची विक्री आणि विपणन यांना 'मार्गावर' आणण्याची अफाट ताकत या मध्ये आहे.


परिस्थिती :

सभोवतालची आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती उद्योगजगतावर सतत प्रभाव टाकत असते. सध्या अनुभवत असलेली परिस्थती ही उदयोन्मुख आणि एकुणात सर्वच उद्योजकांना अभ्यास करायला लावणारी आहे. पेचप्रसंग तर अनेक आहेत, यातून पुढे कसे जायचे ते शिकवण्याची हातोटी फक्त 'परिस्थिती' मध्ये आहे.

जे कोणत्याही शालेय किंवा महाविद्यालयीन अभ्रासक्रमात शिकविले जात नाही किंवा शिकविता येत नाही, ते उदाहरणासहित समजावून सांगण्याची 'कार्य' आपल्या सभोलतालची परिस्थिती ( प्रतिकूल आणि अनुकूल, सुद्धा .. ) सतत करत असते.


पुस्तक :

पुस्तके वाचून उद्योजक होता येत नाही असे म्हणणारे खूप जण आहेत. याचबरोबर हे ही तितकेच खरे आहे की पुस्तकां सारखा गुरू नाही.

ग्रंथ हेच गुरु

पुस्तके मग ती मासिके असोत अथवा क्रमिक पुस्तके, व्यायसाय आणि उद्योग क्षेत्राला वाहिलेले साप्ताहिक असो अथवा इतिहासाचा वेध घेणारे असो , त्यांना वाचा किंवा ऐका , पण रोज काहीतरी वाचाच ... वाचाल तर वाचाल . नाही का?

सजगपणे वाचलेली अनेक यशस्वी उद्योजकांची चरित्रे, आत्मचरित्रे , ही योग्य दिशा देण्याचे, परिस्थिती समजून घेण्याचे, काम निरंतर करत आहेत आणि करत राहतील .

पुस्तक कोणती वाचावीत ? हा अनेकांना पडलेला "गहन" प्रश्न आहे. उत्तर मात्र अतिशय सोपे आहे : कोणतीही वाचा, दिवसाच्या कोणत्याही वेळी वाचा. मात्र,नियमितपणे रोज काही पाने रोज जरूर वाचा

याशिवाय, तुमच्या जवळच्या व्यक्ती तुम्हाला सगळ्यात जास्त योग्य दिशादर्शक म्हणून सतत मार्ग दाखवत असतात. मग तुमच्या कुटुंबातील व्यक्ती असतील किंवा मित्र मैत्रिणी किंवा तुमचे व्यावसायिक जगतातील मित्र आणि सहकारी ...


या पाच गुरूंच्या मार्गदर्शनाने ही उद्योग जगताची 'दुर्गम वाट ' नक्कीच सुसह्य होईल..


या गुरुपौर्णिमेला सर्व गुरूंना ' वंदन' करून , त्यांच्या आशीर्वादाने पुढील 'यशस्वी' वाटचाल करूया ...


Komentarze


bottom of page