top of page

बचत म्हणजे ' गुंतवणूक ' का ?

Updated: Oct 4, 2022

बचत म्हणजे ' गुंतवणुक ' ! !


काय?


थांबलात ना? रोजच्या जीवनात, बचत आणि गुंतवणुक हे शब्द आपण अनेक वेळा वापरतो. अगदी शालेय जीवनापासुन या शब्दांशी आपली अनेक वेळा "गाठ - भेट" झालेली आहे. पण यातील नेमका फरक जाणणारे किती जण आहेत ?


अर्थसाक्षर होण्यासाठी या दोन संकल्पना आणि त्यांच्यातील मूलभूत फरक मूलभूत फरक समजावून घेऊ.


गुंतवणुक म्हणजे काय?


गुंतवणूक म्हणजे स्वतःचे किंवा आपल्या व्यवस्थापनाचे जास्तीचे पैसे, अधिक उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने बॅंकेच्या स्वाधीन करणे किंवा दुसऱ्या व्यक्तीला (वा कंपनीला) त्याच्या उद्योगासाठी देणे. या दुसऱ्या उद्योगाला होणाऱ्या नफ्याचा हिस्सा गुंतवणूकदाराला व्याजाच्या, लाभांशाच्या किंवा बोनसच्या रूपात मिळतो.


हा दुसरा उद्योग आपल्याच मालकीचा असेलच असे नाही. गुंतवणुकीचा मुख्य उद्देश अधिक उत्पन्न मिळवणे हा असला तरी केलेल्या गुंतवणुकीवर अधिक उत्पन्न मिळेलच असे नाही. जिथे गुंतवणूक केली त्या उद्योगाला फायदा झाला नाही तर आपली गुंतवणूक किमान काही काळासाठी व्यर्थ जाऊ शकते.


गुंतवणूक म्हणजे पैसे किंवा संपत्ती वापरून अशा मालमत्ता विकत घेणे, ज्यामध्ये तुमच्या अभ्यासानुसार एक सुरक्षित आणि ठराविक दराने परताव्याची संभावना सर्वाधिक आहे. जेणेकरून आर्थिक मंदी किंवा आर्थिक अडचणीच्या काळात सुद्धा आपल्याकडे पैशाचा एक अविरत प्रवाह सुरू राहील.


उद्योजकांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे खर्च व शिल्लक असे दोन भाग केले तर शिल्लक हा व्यावसायिकांसाठी नफा असतो. या नफ्यातून केलेली गुंतवणूक भविष्यात अधिक उत्पन्न मिळवून देणारी असू शकते किंवा भविष्यातील वाढते खर्च भागविण्याची तरतूद करणारी सुद्धा असू शकते. व्यावसायिकांना वाढते खर्च (विशेषतः भाववाढीमुळे होणारे) भागविण्यासाठी गुंतवणुकीचा निश्चितपणे उपयोग होतो. काही व्यावसायिक मात्र गुंतवणुकीच्या वित्तीय पर्यायांपेक्षा आपल्या व्यवसायातील मालमत्ता वाढविण्यासाठी अधिक प्रयत्नशील असतात, ज्याचा त्यांना निश्चितपणे उत्पन्न वाढविण्यासाठी उपयोग होतो.


बचत म्हणजे काय?

आत्ताच्या घडीला आपल्या वापरात नसलेली ठराविक रक्कम ही आपत्कालीन स्थितीसाठी किंवा भविष्यातील खर्चासाठी बाजूला काढून ठेवणे म्हणजेच बचत होय. हा असा पैसा आहे, जो तुम्हाला ठराविक वेळी अगदी सहजगत्या उपलब्ध झाला पाहिजे. त्यात कोणतीही जोखीम असू नये आणि त्याच्यावर कमीत कमी कर लागू असावा. आर्थिक संस्था आपल्याला बचतीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देतात. त्याच्यामध्ये निरनिराळ्या सरकारी बचत योजना आणि इतर पर्यायांचा समावेश आहे.


बचत म्हणजे आजच्या उपभोगाचा त्याग करून भविष्यासाठी तरतूद, असाही अर्थ होतो. बचत ही एक सवय म्हणूनही वित्तीय नियोजनासाठी उपयुक्त ठरते. याच बचतीतून व्याज मिळते. भविष्यातील गरजांचे नियोजन करता येते, काही अत्यावश्यक/आकस्मिक खर्चासाठी तरतूद करता येते आणि संपत्तीमध्ये वृद्धी होण्यासाठीही बचतीचा उपयोग होतो. बचतीचे गुंतवणुकीत रूपांतर झाल्यास आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करणे सोपे जाते.


एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या खर्चापेक्षा अधिक असलेले उत्पन्न म्हणजे बचत, असा सर्वसाधारण हिशेब केला जातो. उत्पन्नातून खर्च वजा जाता उर्वरित रक्कम म्हणजे बचत, असे समजले जाते. वैयक्तिक दृष्टीने हे बरोबर असले तरी व्यावसायिक/उद्योजकांच्या दृष्टीने या शिलकीस नफा असेही म्हटले जाते. या नफ्यातील काही भाग पुढे गुंतवणुकीसाठी वापरला जाऊ शकतो. तर व्यक्तिगत बचतीमधील बराचसा हिस्सा गुंतवणूक म्हणून वापरला जाऊ शकतो.


बचत असो व गुंतवणूक ती फक्त पैशांचीच करावी असा काही नियम नाही. वेळ आणि साधनसामुग्री यांमध्ये प्रयत्नपूर्वक केलेली बचत ही अनेक असाध्य अडचणींचा सामना करण्यासाठी बळ देणारी गुंतवणूकच आहे.


Comments


bottom of page