top of page

भगवद्‌गीता - जीवनाचा आधार

गीता हा हिंदूचा अत्यंत पवित्र धर्मग्रंथ म्हणून समजला जातो. भागवत धर्माचा भगवद्‌गीता हा मुख्य आधारभूत प्रमाणग्रंथ आहे केवळ भागवत धर्माचाच नव्हे तर हिंदू धर्मातील सगळ्या धार्मिक संप्रदायाचा मान्य असलेला हा ग्रंथ आहे.


भगवत्‌ गीता हा अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिलेला आहे. 'महाभारत' या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ १८ अध्यायांचा (७०० श्लोक) आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे. हिंदू (वैदिक) धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जातात. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते.


भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद' ही म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला 'उपनिषदांचे उपनिषद' असेही म्हणले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हणले गेले आहे.

गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती |
ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी ||
अर्धमात्रा, चिदानंदा, भवग्नी, भयनाशिनी |
वेदत्रयी, परा, अनंता, तत्त्वार्थज्ञानमंजिरी ||

मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो. तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठतम म्हणावा लागेल. विश्वातील लोक भावपूर्ण अंतःकरणाने गीताजयंतीचा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा करतात.


एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे, ही कदाचित अखिल विश्वात गीतेची आगळीवेगळी विशेषता आणि महानता प्रकर्षाने दिसून येते, म्हणूनच

थोर संत विनोबाजींनी गीतेसंबंधी असे म्हटले आहे की,
' माझे शरीर आईच्या दुधावर पोसले, त्यापेक्षाही माझे हृदय व बुद्धी यांचे गीतेच्या दुधावर अधिक पोषण झाले आहे गीता माझे प्राणतत्त्व होय.'

गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आणि त्यांच्या मननाची संपूर्ण साठवण आहे. प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदाचा नान मिळाला आहे. गीता उपनिषदांचेही उपनिषद आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी धनुर्धर अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले आहे. जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रायः प्रत्येक विचार गीतेत आहे. म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोष आहे. समग्र महाभारताचे नवनीत व्यासांनी भगवद्गीतेत दिले आहे.


हजारो वर्षापासून ते आजपर्यंत ऋषी, साधू, संत, भक्त, चिंतक, योगी, कर्मवीर, ज्ञानी मग तो कोणत्याही देशातील, भूप्रदेशातील,काळातील असो कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा असो, त्या सर्वांना गीतेतील अवीट माधुर्याने आणि सौंदर्याने मुग्ध केले आहे. गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखविला. भगवंतांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे.


आजच्या गीता जयंतीच्या अनेक शुभेच्छा !!


コメント


bottom of page