top of page

स्त्री स्वातंत्र्य

आज ८ मार्च जागतिक महिला दिन. सगळीकडे आजच्या दिवशी सगळ्याच महिलांमध्ये आनंदाला उत्साहाला.. उधाण आणि भरती आलेली दिसते. या सर्वांमध्ये पुरुषवर्गही कुठेही कमी पडलेला दिसून येत नाही. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे सत्कार, वेगवेगळे पुरस्कार, आदर्श माता सत्कार इत्यादी कार्यक्रम महिला आणि पुरुष मंडळी आयोजित करत असतात. पारतंत्र्यात असलेला भारत देश स्वतंत्र झाल्याला आता ७५ वर्षे उलटून गेली आहेत. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव नुकताच साजरा करून झाला आहे. संपूर्ण भारत देशाचे सिंहावालोकन केलं तर असे दिसून येते की भारताचा ग्रामीण भाग आजही मागासलेला राहिला आहे. आणि ज्या भागांचे शहरीकरण झाले आहे त्या भागातील लोकांचे राहणीमान उंचावलेले दिसून येते.


भारतातील स्त्रियांच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. ग्रामीण भागातील स्त्रिया शहरातील स्त्रियांच्या मानाने अशिक्षित राहिल्यामुळे, त्यांच्यामध्ये न्यूनगंडाची भावना तयार होते. शिक्षण, शारीरिक ताकद, व अर्थार्जन यांच्या कमतरतेमुळे लवकरच त्यांच्या वाट्याला चूल आणि मूल येऊन पडते. पुरुषांनी घराबाहेरची कामे करायची तर स्त्रियांनी घर संसार सांभाळायचा अशी परंपरागत रूढी परंपरा चालत आलेली आहे. जगरहाटी, संस्कृती, नातेसंबंध, एकत्र कुटुंब पद्धती इत्यादींचा पगडा ग्रामीण भागावर अजूनही खूप दिसून येतो. आजकाल स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संसाराला ताकद, उभारी, प्रगती देण्याचे काम जिद्द आणि अक्कल हुशारीच्या जोरावर करत आहेत. शेतातील विविध कामे, नोकऱ्या, मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देणे याबरोबरच कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेण्याचे कामही त्या करत आहे. ग्रामीण भागातली स्त्री आर्थिक दृष्ट्या अजून तितकीशी स्वतंत्र झालेली दिसून येत नाही.


दारू पिणाऱ्या नवऱ्याकडून शिव्या आणि लाथा बुक्क्यांचा मार तर सासू आणि घरातील इतर महिलांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या शाप आणि छळाच्या बातम्या आपण दररोज वृत्तपत्र आणि दूरदर्शनच्या माध्यमातून पाहत असतो.


महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, रवींद्रनाथ टागोर इत्यादी थोर समाजसुधारकांच्या दूरदृष्टीतून आणि त्याकाळी त्यांनी भोगलेल्या हाल अपेष्टांतून महिलांना शिक्षणाच्या गंगेत सामील केले गेले. या सर्वांचेच फळ म्हणून मुली शिक्षण घेऊ लागल्या. उच्चशिक्षित होऊन सर्वच स्तरांवर यशाचे झेंडे त्यांनी रोवले. 'मुलगी शिकली तर घराची आणि देशाची प्रगती करेल' असे लोक म्हणू लागले. शिक्षणात व बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये तर मुलीच मुलांपेक्षा पुढेच आहेत असे जाणवू लागले आहे. नोकरी, व्यवसाय, सरपंचपदे, जिल्हा परिषदपदे, मंत्रिपदे, मुख्यमंत्रीपदे, राष्ट्रपतीपद, लोकसभा अध्यक्षपद महिलांनी भूषवले आहे. मोठमोठ्या कंपन्यांची सीईओपदे, अगदी अंतराळात देशाचा झेंडा फडकवण्याचे कामही महिलांनी केले आहे.'सातच्या आत घरात..' ही ग्रामीण महिलांनी अजूनही स्वतःला अंगवळणी लावून घेतलेली संकल्पना शहरी भागात आता फारशी दिसून येत नाही. नोकरी आणि व्यवसायांचे स्वरूप बदलल्यामुळे, वेळेचे गणित तिला पाळावे लागते. डॉक्टर, वकील, इंजिनियर, संगीत, सिनेमा आणि इतर वेगवेगळ्या क्षेत्रात त्या नेत्रदिपक कामगिरी करू लागल्या आहेत. स्वतःचे छंद, आवडीची कामे आणि मित्र मैत्रिणींना वेळ देऊ लागल्या आहेत. शहरातील स्त्रिया आर्थिक दृष्ट्या जवळजवळ स्वतंत्र होत आहेत. लग्नासाठी मनाजोगता जोडीदार शोधण्यामध्ये मात्र अडचणी येऊ लागल्या असून, लग्नाची वये तर केव्हाच उलटून जाऊ लागली आहेत. कुणाची बंधने नको असे वाटू लागल्यामुळे लग्नानंतरच्या चार-पाच वर्षातच घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. महिलांना स्वातंत्र्य मिळाल्यामुळे, कुटुंबापासून स्वतंत्र राहण्याचे विचार डोक्यात बळावू लागले आहेत. एकत्र कुटुंबपद्धती असणाऱ्या भारत देशाचे रूपांतर आता स्वतंत्र कुटुंब पद्धती मध्ये होताना दिसत आहे.


महिला दोनचाकी, चारचाकी गाड्या अगदी विमाने सुद्धा बिनधास्त चालवू लागल्या आहेत. वीस वर्षांपूर्वी साडी आणि पंजाबी ड्रेस मध्ये दिसणाऱ्या स्त्रिया आता जीन्स-टॉप मध्ये बदललेल्या दिसतात. सातवा वेतन आयोग आणि एकंदरीतच आर्थिक सुबत्तेमुळे पर्स आणि मोबाईल मध्ये पैसा खेळू लागला आहे. दिसण्यामध्ये आकर्षक रूप यावे म्हणून ब्युटी पार्लर मध्ये जाण्याच्या फेऱ्या वाढलेल्या दिसून येतात. 'स्त्री पुरुष समानता' आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, बरोबरीने काम करणाऱ्या स्त्रिया आता पुरुषांच्याही पुढे जाऊन कामगिऱ्या फत्ते करू लागल्या आहेत. शहरांमधील झोपडपट्टी अथवा उच्चभ्रू सोसायटीतील मुली, महिला नशेच्या आधीन झाल्याच्या, खून, मारामाऱ्या, गुंडगिरी यांमध्ये सहभागी असल्याच्या बातम्या आपण दररोज पाहत, आणि वाचत असतो.


। जिच्या हाती पाळण्याची दोरी।

तीच जगाते उद्धारी।


स्त्रीला लक्ष्मी, माता, जगन्माता, आणि कित्येक देवींच्या रुपांची उपमा दिली जाते. स्त्रीची महती आणि गोडवे गायले जातात. स्त्रियांना स्वातंत्र्य, आदर, मानसन्मान, योग्य वेळेला औषधोपचार, सकस आहार जरूर मिळालेच पाहिजे. परंतु पाश्चिमात्यांचे अंधानुकरण न करता निसर्गाने दिलेली शरीर संपदा, सुडौल बांधा, सौंदर्य, माया ममता, प्रेम या सर्वांची जपणूक करून तिने या सर्वांना वृद्धिंगत करावे. नात्या नात्यांमध्ये गोडवा आणून वेळप्रसंगी चंडीकेचा अवतार घेऊन, एकत्र कुटुंब पद्धतीचा आणि बिघडलेल्या कुटुंब व्यवस्थेचा गाडा पुन्हा रुळावर आणावा. म्हणजे महिला दिनाच्या शुभेच्छा फळाला येतील आणि 'वसुधैव कुटुंबकम' होईल.


©

डॉ. प्रविण डुंबरे, ओतूर

शिवजन्मभूमी (पुणे)

९७६६५५०६४३

コメント


bottom of page