top of page

जीवनप्रवास: डॉ. प्रतिक राजन मुणगेकर.


मुंबई ही स्वप्नांची नगरी. या स्वप्ननगरीत अनेक जण आपले स्वप्न पूर्ण करतात , जगतात .त्यामध्ये सामान्य माणूस ते प्रतिष्ठित/प्रसिद्ध व्यक्तींचा उल्लेख करता येईल.या सामान्यामध्ये एक व्यक्तिमत्व उल्लेखनीय आहे. ज्या व्यक्तीने अल्पावधीत देशभरात, जगभरात शिक्षण ,संशोधन, कला व समाजसेवा या क्षेत्रांमध्ये आपले नाव कमावले, ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर प्रतिक राजन मुणगेकर.

मुंबई शहरात महाराष्ट्रीयन सर्वसामान्य कुटुंबात प्रतिकचा जन्म झाला. कुटुंब चार जणांचे - स्वतः ,आई वडील आणि एक लहान बहिण.प्रतिकचे वडील राजन मुणगेकर कबड्डीपटू आणि गिरणीकामगार होते. त्यांनी सुरुवातीला एका खाजगी कंपनी मध्ये काम केले. पण ती कंपनी बंद पडल्यावर त्यांना मुंबईतल्या मोरारजी मिलमध्ये गिरणी कामगार म्हणून नोकरी मिळाली. कुटुंबातील आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे भावंडांचे शिक्षण व घरातील जबाबदारी पार पडण्यासाठी त्यांना शिक्षण सोडून नोकरी करावी लागली. वैवाहिक जीवनात गुंतल्यानंतर त्यांना पत्नीने वारंवार साथ दिली.


प्रतिकची आई -सौ मनिषा मुणगेकर - आई व गृहिणी म्हणून आपली कर्तव्ये तिने पार पाडली. वेळप्रसंगी मुलांच्या शिक्षणासाठी नोकरीसुध्दा केली. चूल आणि मूल सांभाळताना मुलांवर चांगले संस्कार कसे होतील ? यासाठी सातत्याने प्रयत्न केले. अक्षरशः दोन्ही मुलांच्या शालेय शिक्षण ते उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने आपले सर्व दागिने गहाण ठेवून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणापुढे हात पसरले नाहीत."मुलांनी चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे" हीच इच्छा आई-वडिलांच्या मनात होती. दोन्ही मुलांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अव्वल यावे , यासाठी आई सातत्याने धडपड करत होती. दोन्ही मुलांच्या अभ्यासाची तयारी- पाठांतर, पलाखे म्हणणे ,सुंदर हस्ताक्षर काढणे यावर विशेष भर द्यायची. आपल्या मुलांनी शिक्षणाबरोबर गायन, वादन, नृत्य, वक्तृत्व, कथाकथन, चित्रकला, लेखन, कविता / श्लोक पठण, इ. स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी वारंवार प्रोत्साहन द्यायची. जिथे स्पर्धा असेल तिथे जाण्याची जबाबदारी स्वतः घेऊन मुलांना कसे प्रथम येता येईल? यासाठी प्रयत्न करणारी ही आई खरंच ग्रेट म्हणता येईल. या आईचे मोठेपण असे की पैसा, सुख - सुविधा यांची इच्छा न बाळगता फक्त मुलांनी उच्च शिक्षित व्हावे, हीच ध्येयासक्ती संस्कारित होते.

आपल्याला परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही पण आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, हेच ध्येय उराशी बाळगून मातापित्यांनी दोघांवर चांगले संस्कार केले. अशा आई-वडिलांच्या संस्काराखाली वाढलेला व वास्तव परिस्थितीची जाणीव असलेल्या प्रतिकने लहान वयात एक वेगळे स्वप्न पाहिले -" उच्च शिक्षण घेऊन भारतातील मोठा शास्त्रज्ञ व्हावे" या स्वप्नपूर्ती करिता त्याने पावले उचलण्यास सुरुवात केली.

प्रतिकचे सुरुवातीचे शिक्षण (शिशुवर्ग ते तिसरी) मुंबईमधील आर्. एम्.भट शाळेत झाले. चौथी ते दहावीपर्यंतचे शिक्षण डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर या शाळेत झाले. शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्याने आपले नाव शालेय जीवनात गाजवले होते. सेमी इंग्लिश मध्ये शिक्षण घेऊन दहावी बोर्डाच्या परीक्षेत ८७ टक्के गुण मिळविले.नंतर डिप्लोमाचे शिक्षण घेण्याचे ठरविले.

आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पुढील उच्च शिक्षणात आपल्याला अडचणी येऊ नये वयाच्या सोळाव्या वर्षी मुंबईतील कोचिंग क्लासेस मध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या शिकवण्या घ्यायला सुरुवात केली,जेणेकरून आपल्या शिक्षणाचा खर्चाचा भार आपल्या आई-वडिलांवर पडता कामा नये. सुरुवातीपासून शिकवण्याची आवड असल्यामुळे अध्यापन करताकरता आपलं पुढचं शिक्षण त्याने चालू ठेवले.मुंबईतील प्रख्यात व्हि.जे.टी.आय. कॉलेजमधून रसायनशास्त्र विषयात डिप्लोमाचे शिक्षण घेतले. ज्या कॉलेजमधून डिप्लोमा पूर्ण केला त्याच कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करण्याची संधी ही त्याने मिळवली.त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी या शाखेतून इंजिनियरिंग आणि स्पेक्ट्रोस्कॉपी या विषयात पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले. हे उच्च शिक्षण घेत असताना त्याला नामांकित व्यक्तीचे म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचेही मार्गदर्शन लाभले. माशेलकरांचे विचारतत्वे यांना आदर्श मानून आपल्या प्रगतीपथावर वाटचाल सुरु ठेवली.आज शिक्षण,अध्यापन आणि संशोधन या क्षेत्रात प्रतिकला एक तप म्हणजेच बारा वर्षे पूर्ण झाली. या बारा वर्षांच्या कालखंडात प्रतिकने ८०००हून अधिक विद्यार्थ्यांना विद्यादानाचे काम केले तसेच ४०००हून अधिक विद्यार्थ्यांचे समुपदेशनसुद्धा केले. त्याच्या शिक्षण व संशोधन या क्षेत्रातील योगदानासाठी त्याला ६५०हून अधिक आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. जगभरातून २४०हून अधिक डॉक्टरेट्स (मानद उपाधी) बहाल करण्यात आल्या. तसेच अवघ्या वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी शिक्षण, अध्यापन व संशोधन या क्षेत्रांमध्ये पंधरा विश्वविक्रम करण्यात तो एकमेव भारतीय म्हणून नावारूपास आला.

त्याच्या या प्रवासात त्याने शंभराहून अधिक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये जागतिक, सांस्कृतिक, वैचारिक, वैज्ञानिक अशा अनेक विषयांवर प्रमुख वक्ता म्हणून आपले महत्वपूर्ण योगदान दिले. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येय या विषयावर अभ्यास करून त्यावर आधारित पुस्तकही लिहिले ज्या पुस्तकास अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले व हे पुस्तक अटलांटियन एज्युकेशन प्रोग्राम याचा एक भाग बनले.जागतिक स्तरावरील अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय नियतकालिके,मासिके,वर्तमानपत्रे मध्ये ३५हून अनेक संशोधनपर लेख प्रकाशित झाले. त्याचप्रमाणे विविध विषयांवर पुस्तकांमध्ये सहलेखक म्हणून लेखन केले. हे सर्व करीत असताना प्रतिक भारतीय शास्त्रीय संगीतात जयपूर अत्रौली घराण्याची शास्त्रोक्त तालीम सुद्धा घेत आहे.

आजच्या घडीला प्रा.डॉ.प्रतिक राजन मुणगेकर हे नाव सामान्य राहिले नसून प्रतिष्ठित शास्त्रज्ञ, प्राध्यापक, जागतिक शिक्षणतज्ज्ञ, प्रकाशित लेखक, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता आणि आंतरराष्ट्रीय वक्ता म्हणून नावारूपास येत आहे.

bottom of page