top of page

" मराठी " असे आमुची " मायबोली "

मराठी ही आमच्यासाठी फक्त " भाषा " नाही, तर ती " संस्कृती आहे.

म्हणूनच, आजचा दिवस हा कोणत्याही उत्सवापेक्षा आम्हाला जास्तच " प्रिय " आहे.


मागील अनेक जन्माचे पुण्य असावे , म्हणून या मराठी मातीत, महाराष्ट्रात आम्ही जन्मलो. शिवरायांच्या कथा ऐकत वाढलो. आषाढी कार्तिकी च्या सोहळ्यात, भक्ती रसात चिंब भिजलो . ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, दासबोध , इ. ऐकत, वाचत , बोध घेत , आम्ही जगलो.



हा केवळ भाषेचा प्रश्न नसून समाजाच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे.समाजाच्या परिवर्तनाची वा क्रांतीची पेरणी ही स्वभाषेच्या किनाऱ्यावर होऊ शकते . - कविवर्य कुसुमाग्रज

सह्याद्रीचा पाषाण म्हणजे आमचे हक्काचे ठिकाण. दिल्ली ही देशाची राजधानी असली तरी, आमच्या मनात घर करणारी राजधानी म्हणजे राजांचा गड - रायगड.


आमच्या राजाने फक्त स्वच्छ प्रशासनाचे, स्वराज्याचे धडे नाही दिले, तर स्वधर्म, स्वभाषा , स्वराज्य यांचा अभिमान कसा बाळगावा, हे देखील शिकविले. परकीय भाषेमुळे , माझ्या माय मराठीवर होणारे आक्रमण थांबविण्यासाठी, ' राजव्यवहार कोश ' तयार करणारे शिवराय, हे एकमेव अद्वितीय आहेत .



आणि रोजच्या व्यवहारात नेहमी वापरण्यात येणाऱ्या जवळ जवळ १४०० शब्दांना , शाश्वत मराठी भाषेत आणणाऱ्या श्रीशिवछत्रपतींना मानाचा मुजरा ....


म्हणूनच, शिवरायांचे पाईक होण्यासाठी आता "ही" आपली जबाबदारी आहे _ शुध्द मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर , रोजच्या व्यवहारात करण्याची ...


भक्ती - शक्तीच्या अभूतपूर्व सामर्थ्यावर , उभ्या असलेल्या या शाश्वत मराठी भाषेचे खरे पुरस्कर्ते होणे, याहून पुण्याचे काम ते कोणते ?


आजच्या या मराठी भाषा दिनाच्या शुभ आणि पवान मुहूर्तावर प्रतिज्ञा घेऊया - मला माझ्या मातृभाषेचा खूप अभिमान आहे आणि तिच्या जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.


मराठी वर प्रेम करणाऱ्या सर्व मातृभक्तांना मराठी भाषा दिनाच्या मःपूर्वक शुभेच्छा !

bottom of page