top of page

सुसंवाद

संवाद म्हणजे एकमेकांच्या मतांचे किंवा विचारांचे आदान प्रदान करणे. संदेशाद्वारे चाललेली क्रिया म्हणजे संवाद. एका व्यक्तीचा एका व्यक्तीबरोबर किंवा एका व्यक्तीचा अनेक व्यक्तींबरोबरही संवाद असू शकतो. संवादामध्ये पुढील व्यक्तीची भाषा कोणती आहे याला सुद्धा खूप महत्त्व आहे. दोघांची भाषा एकच असेल तर संवाद साधन्यामध्ये कोणताही अडथळा येत नाही. आणि विरुद्ध भाषा असेल तर आपल्याला ती व्यक्ती काय म्हणते आहे ते काहीच समजत नाही. परिणामी कोणताही गैरसमज होऊन त्याचे रूपांतर भांडणात, मारामारीत होऊ शकते आणि भांडण विकोपालाही जाऊ शकते.


संवाद साधण्यामध्ये जात, धर्म, विभाग, प्रांत किंवा देशाचाही फरक पडू शकतो. एकाच प्रांताचे किंवा देशाचे लोक एकमेकांशी उत्तम रीतीने संवाद साधू शकतात. प्रत्येकाची कला, आवड क्षेत्र वेगवेगळे असू शकतात. काहींना अभ्यासाची, चित्रकलेची, नाटकाची, लेखनाची, कविता करण्याची, अध्यात्माची, गाणे म्हणण्याची इत्यादी आवड असते. ज्या त्या क्षेत्रातल्या लोकांना एकमेकांबरोबर उत्तम संवाद साधता येऊ शकतो. आणि त्यात सुसंवाद असेल तर एकमेकांची कला आदान प्रदान केल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला, आनंद आणि फायदाच होत असतो.


उत्तम संवाद किंवा सुसंवाद साधणारे चांगले मित्र होऊ शकतात. शेजाऱ्या-शेजाऱ्यां मध्ये सुसंवाद असेल तर परिसरातील वातावरण ही चांगले राहते. लोकांना भांडण तंटा आणि कलकल ऐकायला मिळत नाही. आपण घरामध्ये मांडलेल्या प्रत्येक विषयाला चूक किंवा बरोबर अशी बाजू असू शकते. त्यावर घरातील सर्व सदस्यांकडून विचार मागवून घेऊ शकतो. चर्चा करून त्यावर बहुमताने निर्णय सुद्धा होऊ शकतो. काही व्यक्ती आपलंच म्हणणं खरं! असा हेका चालवतात. आणि मग घरात सतत वाद होऊन वातावरण तंग आणि दूषित होऊ शकते. बऱ्याच घरांमध्ये आपण पाहतो व्यक्ती व्यक्तिंमध्ये हे संवाद तुटलेले दिसतात. वर्षानुवर्षे त्यामध्ये कुणीही पडती बाजू न घेतल्यामुळे किंवा कोणी त्यांच्यामध्ये मध्यस्थीही न केल्यामुळे अबोल्याचे वातावरण दिसून येते. घराघरांमध्ये सुद्धा सासु-सुना, नवरा-बायको, वडील-मुलगा, आई-मुलगी यांच्यामध्ये सतत सुसंवाद असेल तर घरातील ही वातावरण नेहमीच मंगलमय राहील.


काही व्यक्ती मूळतःच हुशार, बोलक्या, नेतृत्व करणाऱ्या असतात. अभ्यासपूर्ण संयमी आणि आपले मत दुसऱ्यावर छाप पाडून ठसवतात. अशा व्यक्ती जास्त लोकांबरोबर सुसंवाद साधू शकतात. आणि मग त्यातूनच वक्ते आणि नेतृत्व जन्माला येत असते. हळूहळू त्यांच्यातील ही संभाषण कला विकसित होत जाते आणि मग मोठमोठ्या सभा ते गाजवायला लागतात, हे सारे सुसंवादानेच होते. मोठमोठ्या नेत्यांना ही कला बरोबर अवगत झालेली असते आणि त्यांचे दोन-चार शब्द ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक येतात आणि मैदाने भरून जातात. या नेत्यांना लोक डोक्यावर घेतात. त्यांचा उदोउदो करतात. मोठ्या मतधिक्याने त्यांना निवडून देतात. तर काही नेते बोलण्याच्या ओघात काही बाही बरळतात आणि मग त्यांना समाजाकडून फुलांचे हार गळ्यात पडण्याऐवजी चपलांचे हार मिळतात. 'जोडे मारो' आंदोलने हे सुद्धा होत असतात.

शालेय जीवनामध्ये वाद विवाद स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांमध्ये सहभाग घेणारे विद्यार्थी आपापले म्हणणे अभ्यास करून मांडत असतात. समोरच्याचे मुद्दे खोडूनही काढत असतात. परीक्षक यांचे म्हणणे ऐकून घेतात. आणि जो व्यवस्थित म्हणणे मांडतो त्याला पहिला, दुसरा, तिसरा आणि उत्तेजनार्थ अशी बक्षिसेही दिली जातात.



कमी बोलले तर वाद होऊन वातावरण तंग होत नाही. पूर्वीच्या काळी चित्रपटांमध्ये कोणतेही संवाद नसायचे. आताही काही दक्षिणात्य चित्रपट आहेत, ज्या मधील संवाद किंवा गाण्यांमधील अर्थ आपल्याला कळत नाही तरीही, अभिनय आणि ताल यामुळे आपल्याला आनंद मिळतो. नाटकांच्या किंवा चित्रपटातील अभिनेत्यांच्या संवाद फेकीमुळे ते चित्रपटही गाजतात. चित्रपटातील संवादही अप्रतिम असतात, की ते लोकांच्या बरोबर लक्षात राहतात, आणि वरचेवर म्हटले जातात. अगदी लहान मुलांकडून सुद्धा वारंवार त्यांचा उच्चार होत असतो.

काही वेळेला दोन व्यक्तींमध्ये मूक संवाद होत असतो. मनातले भाव, प्रेम व्यक्त करण्यासाठी मग शब्दांची सुद्धा गरज लागत नाही. कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात...

'शब्दावाचुन कळले सारे

शब्दांच्या पलिकडले'


आणि काहीही न सांगता सुद्धा समोरच्या व्यक्तीच्या मनात असलेले प्रेम, 'सगळीकडे बोंबाबोंब' या चित्रपटातील या सुंदर गीता मधून व्यक्त झालेले दिसते.

'ना सांगताच आज हे कळे मला'

'कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला'

सुसंवाद साधण्याची सुरुवात गुड मॉर्निंग!, सुप्रभात ! राम राम!.. याने सुद्धा होऊ शकते. पूर्वी चिठ्ठी, पत्र, फोन द्वारे संवाद साधला जात असे. आताच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलने क्रांती केल्यामुळे व्हॉट्स ॲप, फेस बुक, इंस्टाग्राम इत्यादी ॲप द्वारे आपण खुप लोकांशी संवाद, सुसंवाद साधू शकतो. चला तर मग, बोला.. पण वाद नको संवाद साधू... आणि तोसुद्धा सुसंवाद असेल तर नात्यांमध्ये बहारच येईल!


©️®️

🦚 डॉ. प्रविण डुंबरे 🦚

ओतूर, शिवजन्मभूमी (जुन्नर) पुणे

९७६६५५०६४३

Recent Posts

See All
bottom of page