top of page

हृदयी वसंत फुलताना..

निसर्ग भारीच...!


अथांग अशा पसरलेल्या अवकाशातून निर्माण झालेलं पृथ्वीचे स्थान, हे समुद्रातील एखाद्या पाण्याच्या थेंबा एवढेच आहे. या संपूर्ण अवकाशाचा आणि आकाश गंगांचा मानवाला अजून संपूर्ण थांग पत्ता सुद्धा लागलेला नाही, तर मग त्यातील एखाद्या कोपऱ्यात पोहोचायचे तर दूरच राहिले. परंतु मानवाला राहण्यासाठी दिलेला 'पृथ्वी..' नावाचा ग्रह हा निसर्गाने खूप सुंदर, वैविध्यपूर्ण, परिपूर्ण, भरभरून दिलेला आणि आश्चर्य वाटावे असाच आहे. या धरतीवर ७० टक्के पाणी, त्याचबरोबर भरपूर हवा, ऑक्सिजन आणि प्रचंड प्रमाणात झाडे-वेलीं, निरनिराळ्या आकार आणि रंगांच्या स्वरूपात निसर्ग संपत्ती दिलेली आहे. समुद्र, ऊन, वारा, पाऊस आणि पाहण्यास सूर्य, चंद्र, तारे आणि अथांग आकाश दिले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी येथे आहेत. माणसाचे मनमोहवून टाकणारी निरनिराळ्या आकारांची रंगीबेरंगी सुवासाची फुले आहेत. आणि भूक भागवण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची फळे सुद्धा दिली आहेत.


निसर्गाने मानवाला चांगला रंग, रूप, आकार तर दिला आहेच परंतु त्याचबरोबर त्याला कंठ, वाणी, बुद्धी, मन आणि भावना सुद्धा दिली आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू म्हणतात तर हे सहा शत्रू मानवाला आपोआप मिळाले आहेत. षड्रिपूं बरोबरच मानवाला आनंद, दुःख, हर्ष, प्रेम, माया, ममता, दया, शांती, करुणा, सद्गुण, सौजन्य, परोपकार, सात्विक प्रेमभाव या गुणांचीही नैसर्गिक देणगी मिळाली आहे. हे सर्व गुण तर इतर कोणत्याच प्राणिमात्रात दिसत नाहीत. या सर्व गुण आणि भावनांचा वापर करत मानवाने निसर्गावर आणि प्राणीमात्रांवर हक्क आणि ताबा मिळवला आहे.


चैत्र आणि वैशाख हे वसंताचे महिने आहेत. वसंत ऋतूला सर्व ऋतूंचा राजा मानले जाते. नवचैतन्य, उत्कर्षाचे, उत्सवाचे प्रतिक म्हणून वसंत ऋतू ओळखला जातो. वसंत ऋतूचे कृषी संस्कृतीशी एक विशेष नाते आहे. भारत हा अतिविशाल देश असल्याने, देशाच्या विविध भागांत वसंत ऋतूत येणारे हिन्दू महिने वेगळेवेगळे आहेत. वसंत ऋतूत झाडाला पालवी फूटते आणि, वसंत पंचमी पासून 'वसंतोत्सव..' सुरू होतो, हे देशभर मानले जाते. वसंत ऋतू म्हणजे नाविन्याची सुरुवात आणि परिवर्तन. हा एक हंगाम आहे जो नवीन सुरुवात करणे आणि पुन्हा सुरू करण्याचे प्रतीक आहे. अनेक महिन्यांच्या थंड तापमानानंतर आपल्यापैकी अनेकांना हिवाळ्यातील निळसरपणा जाणवतो, वसंत ऋतु आपल्याला आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला पुन्हा जागृत करतो आणि सर्वकाही पुन्हा जिवंत करतो.


थंडीचा महिना हिवाळा संपत आलेला असतो आणि त्याचबरोबर शिशिर ऋतू मध्ये पानगळ सुरू होते. जीर्ण झालेली पाने सुकून, गळून, पडून जाऊन सर्व झाडांची पानझड होते. 'जुन्याचा ऱ्हास होतो, आणि नाविन्य त्याची पुन्हा जागा घेते,' हा सृष्टीचा नियमच आहे. वसंत ऋतूचे आगमन सुरू होते आणि 'होलिकोत्सव..!' सुरू होतो. होळी बरोबर थंडी पळालेली असते. दिवसभर उष्णता वाढलेली असते. वाढलेल्या उष्णतेला सुसह्य करण्यासाठी 'धुळवड..' आणि त्याचबरोबर पाच दिवस रंगांचा उत्सव साजरा करून 'रंगपंचमी..' खेळली जाते. झाडा झाडांवर छोटे पिवळे हिरवे कोंब आता फुटू लागलेले असतात. पळस, पांगारा, गुलमोहर, आंबे इत्यादी अनेक झाडांना नवी पालवी आपणास फुटलेली दिसते. वसंताच्या आगमनाने पक्षांमध्येही आनंदी वातावरण झालेले दिसते. कोकीळ आणि पावशा पक्षी काही वेळेला अधून मधून पडणाऱ्या पावसाचे स्वागत त्यांच्या गायनाने करत असतात. मोर आनंदित होऊन थुई थुई नाचायला लागतात. आंब्याच्या डेरेदार पानांमधून कैरी आणि पाड अधून मधून डोकवायला लागतो. आंब्याच्या मोहराचा वास सगळीकडे दरवळत असतो. प्रत्येक झाडन् झाड नवीन पोपटी आणि हिरव्या रंगाच्या चैत्र पालवीने जन्म घेते.


सृष्टीच्या रूपात अचानक बदल घडून आणणारा वसंत ऋतु हा 'ऋतुराज..' म्हणजे सर्व ऋतूंचा राजा आहे. वसंत ऋतुच्या आगमनामुळे सर्व झाडे वेली एका आगळ्याच हिरव्या रुपात रूपांतरित होतात. पाने आणि फळांच्या बहरण्यामुळे सर्व पशुपक्षी आणि माणसांमध्ये उत्साह संचारतो. निरनिराळ्या रंगांच्या पालवीमुळे निसर्गाने नुकतीच मुक्तहस्त रंगपंचमी साजरी केलेली असते. षड्रिपूंवर मात करून मानवाने सुद्धा त्याच्या प्रत्येक नात्यांमध्ये निसर्गाप्रमाणेच प्रेमाचे, हर्षाचे, मायेचे, आनंदाचे रंग उधळावेत. आणि त्याचबरोबर भरभरून निसर्गाच्या मिळालेल्या या खजिन्याला वृक्ष लागवड, संगोपन आणि संवर्धन करून जपावे. आणि 'अशी ही बनवाबनवी' या मराठी चित्रपटातील या गीताप्रमाणे आणि चैत्रपालवीतील रंगीत रंगांप्रमाणे आयुष्याच्या नात्यांमध्ये सुद्धा पूर्णपणे झोकून द्यावे.


'हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे....'

'हृदयी वसंत फुलताना..!',

'नको नात्यांची अढी.'

'काळजी सर्वांची घेताना,'

'उभारू संसाराची गुढी..!'


पशु पक्षांची काळजी, रागावर नियंत्रण, दया, क्षमा, शांती, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असे असेल तर जीवनाची नौका हा भवसागर पार केल्याशिवाय राहणार नाही. या धरेवर वावरताना निसर्ग रुपी अद्भुत खजिना, सृष्टी आपल्यासमोर दररोज रीता करत असते तरी सुद्धा आपण सर्वांनी यावर्षीच्या दुष्काळात आणि

दरवर्षी सुद्धा झाडे लावून, झाडे जगवून निसर्गाचे संगोपन आणि संवर्धन करूया. पृथ्वी मातेला सुजलाम

सुफलाम सुजलाम बनवूया. जे मी माझ्या... स्वतःच्या 'सजवू धरती..' या कवितेतल्या, शेवटच्या कडव्या मधून सांगितले आहे.


'सर्वांनी लावा झाडे वेली,'

'यावर्षीच्या दुष्काळात.'

'सजवू नव्याने वसुंधरेला,'

'शालूच्या हिरव्या रुपात.'




डॉ. प्रविण शांताराम डुंबरे.

ओतूर, (पुणे)

९७६६५५०६४३

Recent Posts

See All
bottom of page