top of page

"आर्थिक नियोजन" करताना इकडे लक्ष द्या .....

अर्थशास्त्राच्या नियमानुसार , पैसे म्हणजे उद्योग-व्यवसायाच्या रक्तवाहिन्या आहेत. आणि या वाहिन्यांमध्ये , रक्ताभिसरण व्यवस्थित होण्याची संपूर्ण जबाबदारी ही उयोजकांची असते. म्हणूनच , कोणतेही नवीन प्रकल्प सुरु करताना किंवा उद्योगासाठी नवीन वर्षातील संकल्प करताना "आर्थिक नियोजन" हे सगळ्यात प्रथम असायला हवे.


व्यवसाय आणि वैयक्तिक आर्थिक ध्येयं वेगळी ठेवायला हवीत. जेवढा व्यवसाय वाढवणं गरजेचं आहे, तेवढंच गरजेचं आहे तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवणं. जर कुटुंबासाठी हवे तेव्हा आणि लागतील तेवढे पैसे नाही पुरवता आले तर त्या व्यवसायातून नक्की काय साध्य होणार, हे लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे.


प्रत्येक वेळी गरज लागली की, आपण घरचे पैसे उचलतो आणि उद्योगामध्ये घालतो; परंतु असे करताना कुठे तरी आपली वैयक्तिक आर्थिक परिस्थिती कमकुवत होतेय का ? याबाबत जागरूक राहायला हवे. म्हणतात ना कळत पण वळत नाही.


उद्योग हा उद्योगाच्या पायावर उभा राहायला हवा. उद्योजकाच्या घराच्या एका खांबावर उद्योग उभा असणे, हे चुकिचे आहे.



उद्योगातून मिळणारा परतावा यावर नेहमीच लक्ष ठेवणं गरजेचं आहे. काही उद्योग भरपूर उलाढाल करतात, परंतु प्रत्यक्ष फायदा मात्र छोटा असतो, तर काही ठिकाणी उलाढाल कमी, पण फायदा जास्त असतो. काही उद्योग सदाबहार असतात तर काहींमध्ये सतत बदल करावे लागतात. काही मोसमी असतात, तर काही बारमाही. काहींना भरपूर भांडवल लागतं, तर काहींना कमी. तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करून कधी, किती आणि कसे परतावे सुरक्षित करता येतील यावर नक्की विचार केला पाहिजे.


कुठलाही उद्योग फक्त चांगला नफा कमावतो म्हणून यशस्वी आहे, असं म्हणता येत नाही. त्या नफ्यामुळे जर वैयक्तिक परिस्थिती सुधारली आणि बँक बॅलन्स वाढला तरच एवढे खटाटोप केल्याचं चीज झालं, असं म्हणता येईल. नाही तर फायदा तर दिसतोय, पण हाताळायला पैसा नाही ! तर काय उपयोग ? हातात भांडवल नसेल नसेल तर उद्योगाचे स्वास्थ कसे राहणार ?


स्वत:चं निवृत्ती नियोजन करताना आपल्या व्यवसायाचं स्वरूप ध्यानात असणं महत्त्वाचं आहे.

एका ठरावीक कालावधीनंतर व्यवसाय आणि वैयक्तिक व्यवहार पूर्णपणे वेगळे करून घ्यायला हवे. जसा नोकरीतून पगार मिळतो आणि त्यातून घरच्या गरजा भागवल्या जातात, त्याचप्रमाणे व्यवसायातूनसुद्धा नियमित पैसे बाजूला काढून वैयक्तिक गुंतवणूक झाली पाहिजे.


एकाच प्रकारच्या व्यवसायावरची मदार कमी कशी होईल, यावर वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे. म्हणून वैयक्तिक आर्थिक नियोजन तर व्हायलाच हवं, पण त्याही पुढे, इतर उद्योग पर्यायसुद्धा लक्षात घेता आले तर त्याचा फायदा नक्की होईल.


व्यवसायाची देणी ही शक्यतो वैयक्तिक पैशातून देण्याची वेळ येऊ नये. परंतु हे जर वारंवार होत असेल तर पुन्हा एकदा व्यवसायाकडे टीकाकाराच्या दृष्टीने बघणं अत्यंत गरजेचं आहे.


कुठलाही व्यवसाय म्हटलं की जोखीम ही आलीच; परंतु, या जोखमीचा तुमच्या संपूर्ण आर्थिक स्थितीवर काय आणि किती परिणाम होणार ? याची तरतूद आर्थिक नियोजनातून करता येऊ शकते.


आपल्यानंतर आपला व्यवसाय पुढे कसा जाणार, कोण नेणार, कुटुंबावर त्याची काय जबाबदारी पडेल, या सर्व प्रश्नांची यादी करून त्यावर सखोल विचार करून तोडगा शोधायला हवा. कारण वेळ सांगून येत नाही. असं व्हायला नको की, तुम्ही मेहनतीने उभा केलेला व्यवसाय तुमच्या पश्चात कुटुंबासाठी डोकेदुखी ठरेल.

जसं वैयक्तिक आर्थिक नियोजनामध्ये वारसा हक्क नियोजन करणं महत्त्वाचं आहे तसंच ते उद्योगाच्या बाबतीतही महत्त्वाचं आहे. तेव्हा योग्य सल्ला घेऊन याबाबतचे निर्णय वेळेवर घ्या.


नोकरीमधून नियमित मिळकत वगळता इतर फायदेही असतात- निर्वाह निधी, आयुर्विमा, आरोग्य विमा, राहण्याची सोय, इमर्जन्सी कर्ज इत्यादी. परंतु व्यावसायिकांना हे मिळत नाही; परंतु या सर्वाची सोय त्यांनाच करावी लागते. तेव्हा एक लाखाचा पगार आणि एक लाखाचा फायदा तुलनात्मक नाही हे ध्यानात ठेवा.


व्यवसाय ही २४ तासांची आणि ३६५ दिवसांची नोकरी आहे आणि म्हणून त्यातून फायदा हा नोकरीपेक्षा जास्त झालाच पाहिजे. वेळोवेळी आपला व्यवसाय हवा तेवढा फायदा देतोय की नाही हे तपासा आणि योग्य वेळी बदल करा. नोकरी असो की व्यवसाय, आर्थिक नियोजन हे आलंच.


उद्योग सुस्थितीत चालू राहण्यासाठी योग्य आणि हे अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना पुढे होणाऱ्या किंवा होऊ शकणाऱ्या अनेक आजारांवरचे रामबाण औषध म्हणजे केलेले , किमान तीन वर्षाचे आर्थिक नियोजन.













bottom of page